तुळशीचा पती शंखचूडाचा शंकराने ‘असा’ केला वध ! नक्की वाचा कथा |


साक्षात देवी तुळशीचा पती असलेला राक्षस शंखचूड हा खूप नशीबवान होता. जन्मजात त्याला वरदान प्राप्त होते तसेच तुळशी सारखी पतिव्रता, तपस्विनी आणि सुंदर स्त्री त्याची बायको होती. परंतु शक्तिमान असूनही त्याच्या एका चुकीमुळे त्याचा कसा नाश झाला हे आज आपण या लेखात जाणून घेऊयात.


• शंखचूडाची जन्म कथा:


तुळशीचा पती शंखचूडाचा शंकराने ‘असा’ केला वध! नक्की वाचा कथा |
तुळशीचा पती शंखचूडाचा शंकराने ‘असा’ केला वध ! नक्की वाचा कथा |


शंखचूड हा राक्षसांचा राजा दंभचा मुलगा होता. दंभ हा राक्षस असूनही विष्णूभक्त आणि मोठा धार्मिक राजा होता. त्याच्या काळात प्रजा सुखी आणि आनंदी होती. परंतु दंभ राजाला एकही अपत्य नव्हते त्यामुळे त्याने लाखो वर्ष श्रीहरी विष्णूंची तपश्चर्या केली. विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला वरदान मागायला सांगितले तेव्हा त्याने तिन्ही लोकात ज्याचा कोणीही पराभव करू शकणार नाही अशा मुलाचे वरदान मागितले. तेव्हा त्याला शंखचूड नावाचा अत्यंत तेजस्वी पुत्र झाला.


• असे झाले शंखचूडचे तुळशी सोबत लग्न:

* **

शंखचूड त्याच्या पूर्व जन्मात सुदामा होता. राधाने दिलेल्या शापामुळे तो राक्षस कुळात जन्मला होता. मोठा झाल्यावर पुष्कर क्षेत्रात जाऊन त्याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने त्याला सदैव विजयी राहण्याचा वर दिला. तसेच सुरक्षेसाठी शंखचूडाला एक दैवी कृष्ण कवच दिले. त्यांनी त्याला बद्रिकाश्रमात जाण्यास आणि बद्रिकाश्रमात गेल्यावर धर्मध्वजाची मुलगी तुळशी त्याची पत्नी होईल असेही सांगितले. तेव्हा ब्रम्हदेवाच्या सांगण्यावरून तो बद्रिकाश्रमात गेला आणि त्याने तुळशीसोबत लग्न केले. तुळशीला घेऊन शंखचूड त्याच्या राज्यात आला. दैत्य गुरू शुक्राचार्यांनी शंखचूडाला राक्षसांचा राजा म्हणून घोषित केले.


• तिन्ही लोकांना जिंकून घेतले:

* *

राजा बनल्यानंतर शंखचूडाने राक्षसांची मोठी फौज बनवली आणि स्वर्ग लोकावर आक्रमण केले. मिळालेल्या वरदानाचा दुरुपयोग करून त्याने सर्वत्र हाहाकार माजविला. सर्व देवतागण स्वर्ग लोक सोडून पळून गेले. त्याने लवकरच तिन्ही लोकात विजय मिळवला. घाबरलेले देवतागण ब्रम्हदेवाकडे गेले. त्यांनी मदतीची याचना केली. परंतु स्वतःच वरदान दिल्यामुळे ब्रम्हदेवाने मी काहीच करू शकत नाही, तुम्ही श्रीहरी विष्णुकडे जा असे सांगितले. परंतु विष्णूंनी सुद्धा दंभ राजाला वरदान दिल्यामुळे ते सुद्धा मदत करण्यास असमर्थ होते. तेव्हा त्यांनी शिवशंभो शंकराकडे जायला सांगितले. अशा तऱ्हेने सर्व देवता गण कैलासावर येऊन महादेवाची प्रार्थना करू लागले. तेव्हा महादेवांनी देवांना या संकटातून मुक्त करण्याचे आश्वासन दिले.


शिवशंभो शंकरांनी सर्व प्रथम पुष्पदंत नावाचा दुत शंखचूडाकडे पाठवला. पुष्पदंतने शंखचूडाला स्वर्गलोक देवांना परत देण्याविषयी महादेवाचा संदेश दिला. परंतु शंखचूडाने स्वर्गलोक परत देण्यास नकार दिला. अहंकाराने उन्मत्त झालेल्या शंखचूडाने महादेवासोबत युद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली.


• महादेव आणि शंखचूडाचे युद्ध:

* *

देवांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शंखचूडाच्या पापातून मुक्त करण्यासाठी  चंद्रभागा नदीच्या किनारी महादेवाचे सर्व गण, कार्तिकेय, गणपती, देवी भद्रकाली तसेच सर्व देवतांची एक फौज उभी राहिली. त्यांचे शंखचूडाच्या लाखोंच्या फौजेशी घनघोर युद्ध झाले. वीरभद्र, भद्रकाली तसेच अनेक देवतांचा शंखचूडाने पराभव केला. महादेवाचे गण आणि देवता शंखचूडाला घाबरून पळून जाऊ लागले. शेवटी महादेव युद्ध भूमीमध्ये उतरले. शंखचूड आणि महादेवामध्ये महाभयंकर युद्ध झाले. परंतु ब्रम्हदेवाच्या वरदानामुळे त्याला कोणीच हरवू शकले नाही.


• असा झाला शंखचूडचा वध:

* **

शंखचूडाची शक्ती त्याच्या गळ्यातील सुरक्षा कवच तसेच त्याची बायको तुळशीच्या पतिव्रतेत होती. जो पर्यंत शंखचूडाच्या गळ्यात दैवी कवच आणि तुळशीचे पावित्र्य आहे  तो पर्यंत शंखचूडाचा आपण वध करू शकत नाही हे महादेवांनी जाणले. तेव्हा ब्रम्हदेवाच्या सांगण्यावरून श्रीहरी विष्णू ब्राम्हण वेषात शंखचूडापुढे गेले. त्यांनी भिक्षा मागताना शंखचूडाला त्याच्या गळ्यातील सुरक्षा कवच मागितले. शंखचूड मोठा विद्वान होता परंतु तो विष्णूंना ओळखू शकला नाही. त्याने लगेच कवच काढून दिले.

* **

नंतर श्रीहरी विष्णू शंखचूडाचा वेष धारण करून तुळशीकडे गेले. तुळशीला वाटले आपला पती युद्धात विजयी होऊन परतला त्यामुळे तिने नवीन वस्त्र परिधान केले. शंखचूड रुपी विष्णूंचे स्वागत केले. तुळशी खूप वेळ विष्णूसोबत इकडे तिकडे फिरली. तिने आनंदाने गप्पा गोष्टी केल्या. विष्णूनी तुळशीचे पावित्र्य नष्ट केल्यामुळे शंखचूडाची शक्ती समाप्त झाली होती. तेव्हा युद्धभूमीत महादेवांनी त्रिशुळाने शंखचूडाला भस्म केले. भस्म केल्यानंतर शंखचूडाच्या हाडापासून एक शंख निर्माण झाला.

* *

शंखचूड विष्णूभक्त होता त्यामुळे आज सुद्धा श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीला शंखाने जल अर्पण केले जाते. तर शिव शंभो शंकरांनी त्याचा वध केल्यामुळे शंकराला शंखाने पाणी चढवले जात नाही. मागच्या जन्मी राधेने सुदामाला राक्षस बनण्याचा शाप दिला होता तेव्हा तुझा उद्धार ही मीच करेन असा आशीर्वाद श्रीकृष्णाने दिला होता. त्यानुसार श्री हरी विष्णूंनी शंखचूडाला मोक्ष देऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती दिली.

** *

कथेतून अशी शिकवण मिळते की कधीही स्वतःच्या शक्तीवर गर्व बाळगू नये. मानवतेच्या दृष्टीने योग्य असेल तेच काम करावे. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा.